पुणे : गेले तीन वर्षे शहरात थैमान माजविणाऱ्या आणि पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या डेंगीची साथ पुन्हा वाढू लागली आहे. डेंगीची लागण झाल्याने ८८ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.डेंगीमुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यांना क्षयरोग, हायपरटेन्शन आणि हृदयविकाराचा त्रास होता. उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी दिली.गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या काळात डेंगीने शहरात थैमान माजवत असल्याचे चित्र आहे. जूनपर्यंत शहरात डेंगीचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे यंदा डेंगीचा प्रभाव जाणवणार नाही, असे वाटत असतानाच जुलै आणि आॅगस्ट महिन्यात डेंगीचे रुग्ण झपाट्याने सापडू लागले आहेत. यंदा जानेवारी ते जून या ६ महिन्यात डेंगीचे ३८ रुग्ण सापडले होते. जुलै महिन्यात डेंगीचे तब्बल ७५ रुग्ण सापडले, तर आता चालू आॅगस्ट महिन्यात २४ तारखेपर्यंत डेंगीचे तब्बल ८२ रुग्ण सापडले आहेत. यामधील एकाचा या आजाराने बळी घेतला आहे. याबाबत डॉ. ठाकूर म्हणाले, ‘‘वर्षातील डेंगीचा पहिला मृत्यू झाला आहे. रुग्ण पुन्हा सापडू लागले असून, ते रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात औषध फवारणी सुरू करण्यात आली असून, जनजागृतीही करण्यात येत आहे.’’ डॉक्टरांसाठी प्रोटोकॉलडेंगीच्या आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांनी काय काळजी घ्यावी, रुग्णांची तपासणी कशी करावी, त्याच्या नोंदी पालिकेकडे कशा पाठवाव्यात आदींबाबत डॉक्टरांसाठी प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहे. शहरातील ७ ते ८ हजार डॉक्टरांना हा प्रोटोकॉल पाठविण्यात येणार आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
ज्येष्ठाचा डेंगीमुळे मृत्यू
By admin | Published: August 25, 2015 5:03 AM