राजेगाव : दौंड तालुक्यात वैध आणि अवैध दारूधंदे कायमस्वरूपी बंद करावेत, यासाठी राजेगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत राजेश्वर मंदिरात १ जानेवारी २०१७ पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती तालुका दारूबंदी कृती समितीचे प्रवर्तक रमेश शितोळे यांनी दिली. याबाबत शितोळे यांनी जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे. दारूबंदी कृती समितीच्या वतीने संपूर्ण तालुकाभर दारूबंदी जनजागृती अभियान, तसेच स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले असून तालुक्यात दारूबंदी करण्यासाठी तालुक्यातील दहा हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व महसुली गावाच्या ग्रामस्थांनी संपूर्ण दारूबंदीसाठी ठराव केले आहेत. तालुक्यात सुमारे १०१ परवानाप्राप्त दारूची दुकाने आहेत. प्रत्यक्षात मात्र २८० ठिकाणी बेकायदा दारूची सर्रासपणे विक्री होत आहे. प्रशासनास दारूबंदी नको आहे, त्यांचे फक्त महसूलकडे लक्ष आहे. दरम्यान, रमेश शितोळे व तालुका दारूबंदी कृती समितीच्या सदस्यांनी नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेऊन त्यांना संपूर्ण तालुका दारूबंदीसाठी समितीने सुरू असलेल्या अभियानाची माहिती दिली. (वार्ताहर)
दौंडला दारूबंदीसाठी आमरण उपोषण
By admin | Published: December 22, 2016 1:47 AM