मंचर : चास (ता.आंबेगाव) येथील शेगर मळा परिसरातून जाणाऱ्या डिंबा डावा कालव्याच्या पाण्यात बुडणार्या अन्विता प्रल्हाद शेगर (वय ९) हिला वाचविण्याचा प्रयत्न करणारे तिचे आजोबा सदाशिव विष्णू शेगर (वय ७०) या दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चास परिसरात सर्वत्र दुःखाची छाया पसरली आहे.
चास येथील शेगरमळा परिसरातून डिंभे धरणाचा डावा कालवा जात आहे. सदाशिव विष्णू शेगर , नात अन्विता प्रल्हाद शेगर व स्वरा प्रल्हाद शेखर (वय ७) हे तिघे जण शेतीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. शेती जवळच असणाऱ्या डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावर नजर चुकून अन्विता कालव्याकडे गेली. तिचा पाय घसरून कालव्यात पडल्याचे आजोबांनी पाहिले व त्यांनी तात्काळ कालव्यात उडी मारून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पाण्यात बुडाले, त्यांच्याबरोबर असणारी दुसरी नात स्वरा हिने मोठ्याने ओरडून आरडाओरड केला. आजूबाजूला असणाऱ्या शेतात काम करणाऱ्या महिलांनी देखील आरडाओरडा करून मदतीसाठी आवाज दिला. सिद्धेश संतोष शेखर यांनी तात्काळ परिसरातील तरुणांना या घटनेची माहिती दिली. दत्ता शेगर,रविभाऊ शेगर, संतोष शेगर, मनोज बारवे व राहुल काळे या तरुणांनी आजोबा व नात यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे.