इंदापूर - इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील पंधारा येथे उघड्या गटारात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण आबाजी कांबळे ( 65 ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून रोहिदासनगर इंदापूर येथील रहिवासी होते. मंगळवारी (7 मे ) रात्री 7.30 वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह इंदापूर पोलीस ठाण्यात ठेवून जो पर्यंत इंदापूर नगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
इंदापूर शहरातील उघड्या गटारात पडून लक्ष्मण कांबळे यांचा मृत्यू झाला. कांबळे यांच्या मृत्यूला इंदापूर नगरपालिका कारणीभूत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावेत तसेच मृत्यू झालेल्या कांबळे यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशीही मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. बुधवार (8 मे) सकाळी आठ वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर ठेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी पंधारा येथील गटारीमध्ये खिल्लारे गुरूजी, लक्ष्मण कांबळे, त्यानंतर वडापुरी येथील एक गृहस्थांचा इंदापूर शहरातील याच गटारात पडून मृत्यू झाला आहे. तर अनेक महिला व लहान मुले पडून जखमी झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मागील दहा वर्षांपासून या परिसरातील नागरिक गटार भूमिगत करण्याची मागणी करत आहेत. मात्र नागरिकांच्या या मागणीकडे नगरपालिका वेळोवेळी दुर्लक्ष करत आहेत असे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांनी सांगितले आहे.
नगरपालिकेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा
इंदापूर शहरातील सर्व भागातील गटारे भूमिगत केली आहेत. मात्र पंधरा या ठिकाणी मागासवर्गीय लोकांची लोकवस्ती असल्याने त्याठिकाणी इंदापूर नगरपालिकेने मुद्दाम गटारे भूमिगत केली नाहीत. त्यामुळे या गटारात पडून पूर्वीही एकूण तीन जणांचा मृत्यू व अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे इंदापूर नगरपालिकेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
- विठ्ठलराव ननवरे - माजी नगराध्यक्ष, इंदापूर