पुणे : रागाच्या भरात ढकलून दिलेल्या मनोरूग्ण व्यक्तीचा मृत्यू झाल्याने तरुण इंजिनिअरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मयूर उर्फ गणेश ज्ञानेश्वर राहणे (वय ३०, राहणार-जनवाडी) असे आरोपीचे नाव आहे. या संदर्भात मृत व्यक्तीची पत्नी सीमा अनिल पगारे (वय-४२) यांनी तक्रार दिली आहे. सीमा यांचे पती अनिल रामचंद्र पगारे हे मानसिक आजाराचा सामना करत होते. त्या संदर्भात त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचारही सुरु होते. आरोपी मयूर हा त्यांच्या घराजवळ राहतो. ३ मार्च २०१९ रोजी अनिल रुग्णालयातून उपचार घेऊन आल्यावर त्यांनी मयूर यांच्या आईला शिवीगाळ केली. त्याचा मयूर यांना राग आला. या विषयावर त्या दोघांचे भांडण सुरु झाले. त्याच दरम्यान शारीरिक झटापटीत मयूर यांनी त्यांना ढकलले. त्यात जखमी होऊन त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी (दि.६ मार्च) रोजी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नीने तक्रार दिली. त्यावरून मयूर यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान आरोपी मेकॅनिकल इंजिनिअर असून स्वतःचा व्यवसाय करतात. यासंर्भात पोलीस उपनिरीक्षक आर.एस. सरडे अधिक तपास करत आहेत