महुडे (पुणे) : भोर येथे श्री रामनवमी व जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडी धावताना धडक बसून एक जण जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. उपचारादरम्यान जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
श्री रामनवमी व जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी शिंद (ता. भोर ) येथील विष्णू गेनबा भोमे ( वय ७० ) हे शर्यत पाहण्यासाठी भोर येथे आले होते. एकेकाळी त्यांच्याकडे शर्यतीचा बैल होता. शर्यत पाहत असताना बैलगाडा धावण्यासाठी सुटल्यानंतर क्षणाचाही विलंब न होता बैलगाडी अंगावर येऊन जोरदार धडक बसली. यात भोमे यांच्या डोक्याला व छातीला मार लागला होता. भोर येथील खासगी दवाखान्यात दाखवून त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.