अवसरी बुद्रुक: टाव्हरेवाडी ता.आंबेगाव येथे बंधाऱ्याच्या पाण्यात विजेचा करंट सोडून मासेमारी करणाऱ्या प्रकाश भिमाजी मधे (वय ५० वर्ष) मुळ गाव वडगाव काशिंबेग यांनाच विजेचा शॉक बसुन पाण्यातच मृत्यू झाला आहे. सदर घटना रविवार दिनांक १४ रोजी सकाळी आठ वाजता घडली असल्याची माहिती मंचर पोलीस स्टेशनचे पो.ह. एस.आर. मांडवे यांनी दिली आहे. याबाबत सविता प्रकाश मधे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सविता मधे व त्यांचे पती प्रकाश मधे मुलगी सोनाली यांच्यासह सुमारे ४० वर्षापासून टाव्हरेवाडी येथील उत्तम तुकाराम टाव्हरे यांच्याकडे शेतमजुर म्हणुन कामास आहे. ते नेहमी येथील ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात मासेमारी करण्यासाठी जात असतात मासेमारी करण्यासाठी ते बंधाऱ्याच्या जवळच असलेल्या लाईटच्या डीपी वरून वायर जोडतात. त्या वायरमधुन येणारा विजेचा करंट पाण्यात सोडून त्याव्दारे मासे बेशुध्द करून मासेमारी करतात. रविवारी सकाळी आठ वाजता प्रकाश मधे बंधाऱ्याच्या पाण्यात पडलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळुन आले असून त्यांच्या जवळ काळ्या रंगाची वायर व ती वायर लाईटच्या डीपीला जोडलेली दिसली. उत्तम तुकाराम टाव्हरे व ग्रामस्थांनी ती वायर डीपीतुन काढून प्रकाश मधे यांना पाण्याच्या बाहेर काढून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून औषध उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. यावरून मंचर पोलिसांनी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पाण्यात विजेची वायर सापडल्याने विजेचा शॉक बसूनच मृत्यू झाला असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.