बारामती : बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर शुक्रवारी (दि २२) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले पोलीस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती, मूळ रा. लासूर्णे,चव्हाणवाडी ता. इंदापूर) यांचे सोमवारी (दि. २५) दुपारी उपचारादरम्यान निधन झाले.
शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ते व्यायामासाठी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते डोक्यावर पडुन गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र,डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या ठीकाणी देखील त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना तेथून पुन्हा रविवारी(दि २४) रात्री बारामतीत खासगी रुग्णालयात आणण्यात आले. या ठीकाणी देखील त्यांची प्रकृती गंभीर होती. सोमवारी उपचारा दरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती.
यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत सध्या ते कार्यरत होते. कदम यांनी बारामती शहर,जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात काम केले आहे.‘डॅशिंग’ पोलीस कर्मचारी म्हणुन त्यांची ओळख होती.त्यामुळे त्यांचा अपघात कि घातपात याबाबत चर्चांना उधाण आले होते.सायंकाळी उशीरा चव्हाणवाडी (ता.इंदापुर) या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परीसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान,या अपघाताबाबत पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, पोलीस कर्मचारी संदीप कदम यांचा अपघात झाल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे.पोलीसांनी याबाबत तपास सुरु केला असुन संबंधित वाहनचालकाचा तपास सुरु असल्याचे तायडे म्हणाले.