कात्रज (पुणे) : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील १६ वर्ष वयाच्या गव्याचा (दि. १ ) दुपारी ३:३० च्या सुमारास मृत्यू झाला आहे. मागील तीन चार आठवड्यापासून गवा आजारी होता. तसेच मागील काही दिवसांपासून गव्याचे अन्न खाणे कमी झाले होते. खाल्लेले अन्न देखील नाका तोंडातून बाहेर पडत होते.
साधारणपणे गव्याच्या प्रजातीमध्ये गव्याचे वयोमान हे १५ ते २० वर्ष असते. परंतु हा गवा १६ वर्षापर्यंत जगला. गवा आजारी नसता तर तो आणखी २ ते ३ वर्षे जगला असता असं सांगितले जात आहे. या गव्याचे वजन अंदाजे ६०० किलो होते. सदरील मृत गवा २००९ साली म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयातून आणण्यात आला होता.
क्रांतीसिंह नाना पाटील पशू वैद्यकीय महाविद्यालय येथील सहयोगी प्राध्यापक यांच्याकडून शवविच्छेदण केल्यानंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालयात रात्री ७:३० च्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राजकुमार जाधव यांनी दिली. सध्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात २ गवे आहेत.