पुणे: ज्येष्ठ सेंद्रीय बागकर्मी दिगंबर उगावकर (वय ८६) यांचे नुकतेच हदयविकाराने निधन झाले. पुण्यातील गच्चीवर बागा फुलविण्यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून मार्गदर्शन करत होते. तसेच त्यांनी अनेकांना बागकामाचे धडे दिले आहेत. त्यांच्या मागे पत्नी आशा उगावकर व परिवार आहे.
उगावकर यांनी अखेरपर्यंत मातीशी नाळ जोडलेली ठेवली. त्यांची अखेरची इच्छा देहदान करावे, अशी होती. ती त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण केली. उगावकर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. भारतात व परदेशात त्यांनी काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही इलेक्ट्रिकलचे काम त्यांनी केलेले आहे. व्यावसायिक क्षेत्रातून निवृत्त होऊन ते परसबाग, गच्चीवरील बाग यासाठी पूर्णवेळ काम करत होते. कोणाच्या गच्चीवर बाग करायची असेल तर ते मोफत मार्गदर्शन करायचे. त्यांनी बागकामाचे वर्ग घेतले.
''उगावकर सरांनी खूप जणांना बागकाम शिकवले. ते म्हणायचे की, प्रत्येकाने आपल्या घरातच स्वत:साठी भाजीपाला पिकवला पाहिजे. शहरात आता जागा नसली तरी गच्चीवर खूप मोकळी जागा असते. त्या ठिकाणी भाजीपाला पिकवता येतो. म्हणून त्यांनी गच्ची हिरवीगार करण्याचा ध्यास घेतला होता. सेंद्रीय भाजीपाला हा त्यांचा उद्देश होता. कारण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती मह्त्वाची आहे, असे ते सांगायचे. - स्नेहल गोखले, बागकाम ग्रुपच्या सदस्य''