निरगुडसर (पुणे ): समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय ४८)त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८), व मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत दरम्यान या घटनेमुळे गंगावणे कुटुंबीयांवर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे.
मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे वास्तव्यास आहेत. कैलास गंगावणे हे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात २७ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय विदर्भ ट्रॅव्हल्स बसने पुण्याला यायला निघाले होते. आज पहाटे सिंदखेड राजा येथे पिंपळखुटा नजिक बसचा अपघात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. गंगावणे कुटूंबातील सदस्यांनी या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही.
बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कैलास गंगावणे यांचे मेव्हणे अमर काळे यांनी शोध सुरू केला. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघातात बाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत.
अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांचे अश्रुंचे अक्षरक्ष बांध फुटले.विद्यालयात शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालय बंद करण्यात आले. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता.