केडगाव (पुणे) : पारगाव येथील वयोवृद्ध उच्चशिक्षित इंजिनिअर शेतकऱ्याचा महावितरणच्या वाईट कारभारामुळे जागीच मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटना मंगळवार(दि.६) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाली.
मारुती बाजीराव दिवेकर (वय ७५ वर्ष) (रा. पारगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात नातेवाईक रामकृष्ण ताकवणे यांनी यवत पोलिसात तक्रार दिली आहे. दिवेकर हे रेणुका मंदिर परिसरातील आपल्या गव्हाच्या शेतामध्ये पिकाला पाणी देत होते. शेजारी विद्युत खांब होता. खांबाच्या ताणामध्ये विद्युत प्रवाह आला. पाणी धरत असताना नजर चुकीने दिवेकर यांचा हात ताणाला लागल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. दिवेकर हे १९६५ साली पारगाव येथील पहिले इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाले. रेणुकादेवी दूध संस्थेचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांचे ते मेहुणे होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.