पौड : काशिग तालुका मुळशी येथे पर्यटनासाठी आलेला असताना हाडशी बंधाऱ्यात बुडालेल्या शिवम सूर्यकांत पाटील (२३, रा. सागरली, डोंबिवली) याचा मृतदेह शोधण्यात मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले आहे.
सुटीनिमित्त शिवम मित्र व नातेवाईक भावेश पाटील, साहिल पाटील, अविनाश पाटील, राहुल पाटील, विनायक कुराडे, अमित घाटे, साबू सत्यन यांच्यासोबत मुळशी तालुक्यातील काशीग गावाजवळ फार्महाउसवर राहण्यासाठी गेला होता. ४ जूनला संध्याकाळी हाडशी बंधाऱ्यावर शिवम एका मित्रासोबत पोहण्यासाठी गेला. दोघे पाण्यात उतरले असताना पोहताना शिवम पाण्याखाली चिखलात रुतला. मित्राला तो कुठेच दिसेना म्हणून त्याने स्वप्निल टेमघरे यांना बोलावले. त्यानंतर काशिग गावचे पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती पौड पोलीस स्टेशनला दिली.
पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु पोलीस पथक पोहोचेपर्यंत अंधार पडल्याने परवा रात्री शोधकार्य करता आले नाही. रविवारी सकाळी शोधकार्य सुरू असताना शिवमचा मृत्युदेह आढळला. शिवमचा मृतदेह पौड ग्रामीण रुग्णालय दाखल केला आहे.