पुणे : स्वाइन फ्लूमुळे आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे या वर्षातील स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृतांची संख्या २ झाली आहे. दरम्यान, एकाची प्रकृती अत्यवस्थ असून, त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.दत्तात्रय नामदेव कापरे (वय ६०, रा. नाझरे सुपे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रकृती अत्यवस्थेमुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ जुलैला त्यांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते. १६ जुलैला आलेल्या तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कापरे यांनी उपचारास ३ दिवस उशीर केल्याने स्वाइन फ्लूचे विषाणू बळावून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पुणे महापालिकेने केली आहे. (वार्ताहर)
स्वाइन फ्लूमुळे पुरंदरच्या एकाचा मृत्यू
By admin | Published: August 01, 2014 5:27 AM