महावितरणचे साफ दुर्लक्ष
महावितरणचे दुर्लक्ष : वीजतारा लोंबकळत असल्याने नागरिक संतप्त
मेखळी : बारामती तालुक्यातील मेखळी येथील भोसलेवस्ती व गावातील इतर ठिकाणी विजेच्या तारा हाताच्या अंतरावर खाली आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तक्रार करूनदेखील महावितरणने दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
मेखळीतील शेरेवस्ती येथील गणेश किसन भोसले यांच्या घरासमोरील विजेचा खांब अर्ध्यातून मोडल्यामुळे मागील वर्षभरापासून विजेच्या तारा अंदाजे सात फुटाच्या अंतरावर आल्या आहेत. याप्रश्नी महावितरणचे अधिकारी गावडे व यादव यांच्याकडे वारंवार तक्रार करूनदेखील महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. सध्या मोडलेला खांब आधारावर उभा आहे. सध्या पावसाळा सुरू असून जोरात सुटणाऱ्या वाऱ्यामुळे हा खांब व तारा केव्हाही जमिनीवर पडून जीवितहानी होऊ शकते. ही बाब महावितरण व संबंधित अधिकारी एखाद्याचा जीव गेल्यावर गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.
यांसदर्भात बोलताना मेखळीचे सरपंच रणजित देवकाते म्हणाले, भोसलेवस्ती येथील खाली आलेल्या तारांसंदर्भात महावितरण सोबत २५ मे रोजी पत्रव्यवहार व त्यानंतर वेळोवेळी संपर्क करूनदेखील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून हा प्रश्न मांडणार आहे.
मेखळी येथील भोसलेवस्ती व गावातील इतर ठिकाणी विजेच्या तारा हाताच्या अंतरावर खाली आल्या आहेत.
२००८२०२१-बारामती-०४