पुणे : पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काल रात्री एक दुर्देवी घटना घडली आहे. लाेखंडी विंग अंगावर पडून रंगमंच सहाय्यक असलेल्या विजय महाडीक यांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा विंगा काढून ठेवण्याचे काम करत असताना त्या अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगमंच सहाय्यक म्हणून विजय महाडीक काम करत हाेते. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून ते नाट्यगृहात कार्यरत हाेते. आज हॅम्लेट या नाटकाचा प्रयाेग हाेता. या प्रयाेगासाठी नाट्यगृहाच्या विंग काढून टाकाव्या लागत असल्याने काल रात्री साधारण 1.30 च्या सुमारास ते विंग काढण्याचे काम करत हाेते. सर्व विंग काढून एका भिंतीला लावण्यात आल्या हाेत्या. शेवटची विंग काढून ठेवताना इतर विंग त्यांच्या अंगावर काेसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आज सकाळी त्यांना मृत घाेषीत करण्यात आले. महाडीक हे रंगमंच सहाय्यक म्हणून प्रसिद्ध हाेते. सर्वांना ते नेहमीच सहकार्य करीत असत. दरम्यान लाेखंडी विंग ऐवजी लाकडी विंग नाट्यगृहांमध्ये वापरण्यात याव्यात अशी मागणी बॅकस्टेज कलाकारांकडून करण्यात येत आहे.
बॅकस्टेज आर्टिस्ट असलेले रवी पाटील म्हणाले, काल रात्री ही दुःखत घटना घडली. गेली अनेक वर्षे महाडीक हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काम करत हाेते. काल त्यांचा लाेखंडी विंग अंगावर पडून मृत्यू झाला. लाेखंडी विंग या लाकडी विंगांपेक्षा तुलनेने जड असतात. त्यांना हलवताना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे बालगंधर्व प्रमाणे इतर नाट्यगृहात देखील लाकडी विंगांचा वापर करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
दरम्यान या संदर्भात महापालिकेच्या नाट्यगृहांचे व्यवस्थापक सदाशिव लायगुडे यांच्याशी संपर्क केला असता, हाेऊ शकला नाही.