पौड : मुळशीत उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या चेन्नई येथील तीन शाळकरी मुलांचा धरणात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी ( ता.२५ ) रोजी कातरखडक धरणावर फिरण्यासाठी गेली असता तिघे जण पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. एक मृतदेह सापडला असून बाकीचे दोन मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.डॅनिश राजा (वय १३), संतोष के. (वय १३), सर्वान्ना (वय १३ ) असे धरणात बुडालेल्यांची नावे आहेत. यातील डॅनिश राजा याचा मृतदेह सापडला असून बाकी दोघांचा शोध सुरु आहे. शोध कार्य रात्री उशिरा थांबवले असून (ता .२६ )रोजी सकाळी लवकरच शोधकार्यास सुरुवात झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील ए. सी. एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशी मधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कूल ऑफ थॉट या ठिकाणी आलेले होते.आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते. यासाठी १३-१५ वयोगटातील २० विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. त्यांच्यासोबत एक शिक्षक तर तीन शिक्षिका असे चार जण सोबत आलेले आहेत. शिबिराचा आज (बुधवार) पहिलाच दिवस होता . येथून जवळच असलेल्या कातरखडक या धरणावर सर्वजण फिरायला गेले असता वरील तिघेजण पाण्यात उतरले असता त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच गावातील मंडळी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुळशीचे तहसीलदार यांनी मुलांच्या कुटुंबियांना कळवण्यास सांगितले असून मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरु होते. डॅनिश राजा या मुलाचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहे ,तर बाकी दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सकाळी लवकरच सुरु होणार आहे. रात्रीच्यावेळी बंदोबस्तासाठी २ पोलीस कर्मचारी तसेच ग्रामसुरक्षा दलाचे जवान घटनास्थावर थांबलेले आहेत. दरम्यान, मुलांच्या कुटुंबीयांना कळवले असून ते चेन्नईवरून निघाल्याचे समजते. परराज्यातून शिबिरासाठी आलेल्या छोट्या मुलांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुळशीजवळील कातरखडक धरणात पडून चेन्नईतील तीन मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:48 AM