ऑनलाइन लोकमतकर्वेनगर, दि. 9 - झोपेमधून उठलेली तीन वर्षांची चिमुकली इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन थेट खाली पडल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना सकाळी साडेसातच्या सुमारास करिष्मा सोसायटीमध्ये घडली. ही घटना घडली तेव्हा घरामध्ये कोणीही नव्हते. अलंकार पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
निकीता अभिजीत पाटील (वय 0३, रा. करीश्मा सोसायटी, कोथरूड) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पाटील करिष्मा सोसायटीच्या इमारत क्रमांक 12 मधील सातव्या मजल्यावरच्या सदनिकेत राहतात. अभिजीत आणि त्यांची पत्नी संगणक अभियंता आहे. त्यांना निकितासह दोन मुली आहेत. त्यांची पत्नी दररोज सकाळी लवकर कामावर जाते. मोठी मुलगी शाळेत जात असल्याने सकाळी तिला घ्यायला बस येते. तर अभिजीत स्वत: नऊच्या सुमारास निकीताला शाळेमध्ये सोडून कामावर जातात.
गुरुवारी सकाळी निकीताची आई कामावर गेली. साडेसातच्या सुमारास तिच्या बहिणीची स्कूलबस आली. निकीता झोपलेली असल्यामुळे अभिजीत यांनी घराचे दार आतून बंद करुन घेतले. मोठ्या मुलीला सोडण्यासाठी ते खाली गेले होते. त्यानंतर काही वेळातच निकीता थेट खाली पडल्याचे त्यांना समजले. या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. जखमी निकीताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला उपचारांपुर्वी मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. अभिजीत मोठ्या मुलीला स्कूलबसपर्यंत सोडण्यासाठी गेले असताना निकीताला जाग आली असावी. घरात कोणी दिसत नसल्याने ती गॅलरीत गेली असावी. तेथून वाकून पाहात असतानाच तोल गेल्याने ती खाली पडली असवी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.