पुणे : कोथरुड येथील महात्मा सोसायटीमधील बंगल्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. संपूर्ण बंगलाच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे घरातील एकही वस्तू शिल्लक राहिलेली नव्हती. जीव वाचवण्यासाठी एका विवाहितेने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. ही महिला जखमी झाली असून अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तरुणींसह त्यांच्या वडिलांची सुखरुप सुटका केली. या घटनेमुळे इमारतींमधील आग प्रतिरोधक यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.शरयु मधुसुदन मुद्गल (वय ७७, रा. बंगला क्र. ४३१, महात्मा सोसायटी, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची सून स्वाती जयंत मुद्गल (वय ४४) या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे जखमी झाल्या. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत मुद्गल यांचा व्यवसाय आहे. महात्मा सोसायटीतील बंगला काही महिन्यांपूर्वीच त्यांनी बांधलेला आहे. बंगल्याच्या तळमजल्यावर त्यांची आई शरयु रहात होत्या. (प्रतिनिधी)
कोथरुडमध्ये भीषण आगीत महिलेचा मृत्यू
By admin | Published: December 23, 2014 5:33 AM