पुणे : मित्रमंडळ चाैकात दुचाकी चालक अाणि एका रिक्षाचा किरकाेळ अपघात झाला. अपघातानंतर दाेघेही भांडत बसले. भांडण चालू असताना रिक्षातून प्रवास करणाऱ्या 65 वर्षीय महिलेला अस्वस्थ वाटू लागले. त्या रिक्षातून खाली उतरुन रस्त्याच्या कडेला बसल्या, त्यांना अाजूबाजूच्या लाेकांनी पाणी दिले. तरीही ते दाेघे भांडतच हाेते. त्या महिलेला चक्कर अाल्याने त्यांना नागरिकांनी दुसऱ्या एका रिक्षातून हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किरकाेळ अपघातात भांडत बसत महिलेला रुग्णालयात दाखल न करणाऱ्या बेजबाबदार रिक्षाचालक अाणि दुचाकीस्वाराविरुद्ध दत्तवाडी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. रिक्षाचालक व दुचाकीस्वाराची अद्याप अाेळख पटली नसून त्यांचा शाेध पाेलीस घेत अाहेत. वत्सला केरबा डाेईफाेडे (वय 65, रा. नेरळ, नवी मुंबई) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव अाहे. पाेलीस उपनिरिक्षक विकास जाधव यांनी याप्रकरणी दत्तवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डाेईफाेडे या त्यांच्या एका नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी पुण्यात अाल्या हाेत्या. शुक्रवारी (27 एप्रिल) दुपारी बाराच्या सुमारास डाेईफाेडे या रिक्षातून प्रवास करीत हाेत्या. मित्र मंडळ चाैकात रिक्षाचा अाणि दुचाकीस्वाराचा किरकाेळ अपघात झाला. अपघातानंतर दाेघांनी रस्त्यातच भांडायला सुरुवात केली. दरम्यान डाेईफाेडे यांना चक्कर आल्याने त्या रिक्षातून उतरल्या, त्यानंतर त्या लगेचच बेशुद्ध पडल्या. नागरिकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. डाेईफाेडे यांना रुग्णालयात दाखल करण्याएेवजी भांडत बसून तेथून पसार झाल्याने रिक्षाचालक अाणि दुचाकीचालकावर कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. चाैकातील सीसीटिव्हीच्या आधारे त्या दाेघांचा शाेध पाेलीस अाता घेत अाहेत. दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल अाल्यानंतर डाेईफाेडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.
दाेघांच्या भांडणात महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 4:22 PM