पुणे : सुतारवाडी येथील उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) या संरक्षण विभागाच्या कंपनीत ज्वलनशील पदार्थाचे सॅम्पल घेत असताना त्याने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत एका कामगाराचा भाजून मृत्यू झाला तर, दुसरा कामगार जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता सुतारवाडी येथील कंपनीत घडली. लक्ष्मीकांत रमेश सोनवणे (वय २६, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर योगेश कीर्तिकर हे भाजून जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.एचईएमआरएल ही संरक्षण खात्याच्या अंतर्गत काम करणारी कंपनी असून पाषाण येथील सुतारवाडीमध्ये १९६० सालापासून ती कार्यरत आहे. संरक्षण दलाला लागणाऱ्या उच्च स्फोटक द्रव्ये अन्य सामुग्रीचे संशोधन व चाचणी येथे केली जाते. याबाबत पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मीकांत सोनावणे हे मंगळवारी दुपारी ज्वलनशील पदार्थाचे सॅम्पल घेण्याचे काम करीत होते. त्यावेळी या ज्वलनशील पदार्थाने अचानक पेट घेतल्याने त्या ठिकाणी आग लागली. या आगीत त्यांचा भाजून मृत्यू झाला. तसेच त्यांच्याबरोबर तेथे काम करणारे योगेश कीर्तिकर हेही भाजले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सुतारवाडी येथील एचईएमआरएल कंपनीतल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:05 PM