दौैंड : दौैंड येथील सुनील थोरात (वय ३५, रा. भीमनगर, दौंड) याचे आकस्मिक निधन झाल्याची माहिती दौंड शहर पोलिसांनी दिली; मात्र रेल्वेपोलिसांनी मारहाण केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सुनील थोरात यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केला आहे. रेल्वेचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे यांनी शहर पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, दौैंड रेल्वे पोलिसांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी हवा असणारा संशयित युवक सुनील थोरात याला राहत्या घरातून रेल्वे पोलीस स्टेशनला आणण्यासाठी माझ्यासह तीन पोलीस गेले होते. आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो आणि त्याला घेऊन जात असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. जीपमधून नेत असताना त्याने रस्त्यात उलटी केली, तेव्हा अन्य पोलिसांच्या मदतीने त्याला आम्ही शासकीय दवाखान्यात घेऊन गेलो. वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ............पोलिसांच्या मारहाणीमुळेच मृत्यू आमच्या घरी रेल्वेचे चार पोलीस रात्री सुनीलला घेण्यासाठी आले होते. पोलिसांनी आमच्यासमोर त्याला मारहाण केली. त्यामुळे त्याला उलट्या झाल्या आणि तो मृत्युमुखी पडला. त्याच्या मृत्यूस रेल्वे पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. .............सदरचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिलेला आहे. सुनील थोरात याचे शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथे शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.- सुनील महाडिक,पोलीस निरीक्षक, दौैंड............सुनील थोरात याला रेल्वे पोलिसांनी मारहाण केलेली नाही. उलट त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणत असताना त्याने त्याच्या घराजवळच उलट्या केल्या. परिणामी, पोलिसांनी त्याला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात नेले. - दीपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक रेल्वे दौंड........
रेल्वे पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू ; कुटुंबीयांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:12 PM
रेल्वे पोलिसांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी संशयित हवा होता..
ठळक मुद्देकुटुंबीयांचा आरोप : पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद