हडपसर : डंपरखाली दुरूस्तीचे काम करत असताना विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. तर डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास मांजरी बुद्रुक रस्ता रंगीचा ओढा येथे ही घटना घडली आहे. इरफान उमेद खान (वय ३२, रा. १५ नंबर, हडपसर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर वाहनचालक गणेश मोरे (रा.मांजरी ) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंगीचा ओढा येथे इरफान हा डंपरच्या खाली दुरूस्तीचे काम करत होता. काम करत असताना त्याला पुरेसे दिसत नव्हते. त्यामुळे त्याने वाहनचालक मोरे याला डंपरचे डंपिंग उचलण्यास सांगितले. त्यात वरून गेलेल्या वीजेच्या तारांना डंपर चिकटला आणि त्याचा करंट लागताच वाहन चालक गणेश मोरे बाहेर फेकला गेला, तर फिटर इरफान खान बेशुद्ध पडला. उपचारासाठी हडपसर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी इरफान खानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डंपर चालक गणेश मोरे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. पोलिस अधिकारी गिरीधर यादव पुढील तपास करत आहेत. एच.टी लाईनला गार्डीन लाईन नसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वाटतो. हा अपघात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे. ही लाईन तुटल्यावर आणि गार्डीन लाईन असती हा अपघात झाला नसता. तर याबाबत सहाय्यक अभियंता बाजीराव दुबल यांच्याशी संपर्क साधला असता मात्र संपर्क होवू शकला नाही.
विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
By admin | Published: October 19, 2015 2:03 AM