पुणे : डायलिसिस चे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान अचानक त्रास झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार नगर रोड येथील एका खासगी रुग्णालयात शनिवारी दुपारी घडला. मात्र, रुग्णाला वेळेवर योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित रुग्णालय व जबाबदार दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
प्रदीप सखाराम खांदवे (वय 37, रा. खांदवे नगर लोहगाव पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
खांदवे यांच्यावर सहा महिन्यांपासून या रुग्णालयात डायलिसिसची उपचार सुरू होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते पत्नीसह डायलिसिससाठी रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे डायलिसिस तात्काळ थांबविण्यात आले. थोड्या वेळाने पुन्हा सुरू केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले. यानंतर त्यांची कोवीड तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती तपासणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना कोवीड आयसीयूमध्ये हलवण्यात आले.
दरम्यान, नातेवाईकांनी त्यांच्या परिचयातील खाजगी डॉक्टर मार्फत रुग्णाच्या प्रकृतीची माहिती जाणून घेण्यासाठी रुग्णालयाकडून परवानगी मागितली होती. शनिवारी सकाळी त्यांना त्याबाबत परवानगी देण्यात आली. संबंधित डॉक्टर हे पाहणीसाठी गेले असता रुग्णाची हृदयक्रिया बंद पडली होती. रुग्णालयातील डॉक्टर रुग्णाला पंपिंग (सीपीआर) करत होते.हे डॉक्टर बाहेर येताच रुग्णालयाकडून रुग्ण दगावल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्याशिवाय रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे खांदवे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही प्रक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.