पुणे : मित्रांसमवेत जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तळजाई टेकडीवरील पुणे महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये हा प्रकार घडला. प्रफुल्ल भीमराव वानखेडे (वय २१, रा. म्हात्रे पूल, दत्तवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या तळजाई स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हा तलाव आहे. प्रफुल्लला जलतरण तलावातून बाहेर काढल्यानंतर तातडीने त्याला सातारा रस्ता येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तत्पूर्वी सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा पाठविण्यात आला. बारावीत नापास झाल्याने प्रफुल्ल पुनर्परीक्षेसाठीचा अभ्यास करीत होता. तसेच तो एका खासगी कंपनीत कामाला होता. तर त्याच्या मोठा भाऊ इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. दरम्यान, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रफुल्लचा जीव गेला असल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला.याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. एका जीवरक्षकाकडे चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.>योग्य खबरदारी न घेतल्याचा बळी?जलतरण तलावांवर दुर्घटना घडू नये यासाठी रेस्क्यू रिंग, बारा फूट लांब बांबू, प्रथमोपचार पेटी, तलावाची खोली याविषयी माहिती देणारे फलक, आॅक्सिजन किट, तलावानजीकच्या हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक, अचानक काही दुर्घटना घडल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी अॅम्ब्युलन्सचे क्रमांक, तलाव परिसरात घ्यावयाची काळजी आदींची संपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे.तलावांवर प्रवेश करतानाच सुरक्षिततेसाठी रेलिंग लावणे, स्वतंत्र महिला प्रशिक्षक नेमणे, महिलांच्या बॅचना ठरावीक वेळा नेमून देणे, आदी नियम पालिकेने घातलेले असतात. मात्र, त्यातील अनेक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे योग्य खबरदारी न घेतल्याने हा मृत्यू झाले आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:41 AM