पुणे: महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप पदाधिका-यांची कार्यालय स्थलांतरीत झालेली नाही. नवीन संपूर्ण चार मजली इमारत केवळ पदाधिका-यांसाठी देण्यात आली असली तरी, सध्या कोणाला कोणते कार्यालय व किती जागा यावरून वाद सुरु आहे. यामुळे फर्निचरचे काम पूर्ण होऊन देखील अद्याप पदाधिकारी नविन जागेत स्थलांतरीत झालेले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालयांच्या जागा वाटपाचा वाद सुरु असल्याने अखेर बुधवारी शिवसेने दुस-या मजल्या वरील सभागृह नेत्याच्या समोरील जागेवर शिवसेनेचे नाव टाकून ताबा मारला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेली जागा कमी पडत असल्याने शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्रांवर चार मजली इमारत बांधली आहे. तब्बल ५४ कोटी रुपये खर्च करून भव्या चार मजली इमारत बाधण्यात आली आहे. या इमारतीत ७२ फूट व्यासाचे गोल घुमटाचे महापालिकेचे मुख्य सभागृह, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते विविध पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये, तसेच समित्यांच्या अध्यक्षांची कार्यालय, नगरसचिव कार्यालय असणार आहेत. ही नविन विस्तारित इमारत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असून, त्यामध्ये अद्ययावत वातानुकूलित यंत्रणा, ६ लिफ्ट, एलईडी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा आणि अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिम बसविण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म सिस्टिम बसविण्यात आली आहे. तर फर्निचर व अन्य गोष्टींवरच तब्बल २८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.परंतु, सध्या इमारतीत पदाधिका-यांच्या कार्यालयाच्या जागा वाटपावरून वाद सुरु असून, महापौर कार्यालयासाठी तिस-या मजल्यावर मुख्य सभागृहाच्या समोरची जाग निश्चित झाली असून, महापौर मुक्ता टिळक यांनी अनौपचारिक कार्यालय प्रवेश केला आहे. परंतु, दुस-या मजल्यावरील कार्यालयाच्या जागा वाटपा वरून वाद सुरु आहेत. यामध्ये दुस-या मजल्यावर उपमापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, शहर सुधारणा समिती, विरोधीपक्ष नेत्यांना कार्यालय देण्याचे जवळजवळ निश्चित करण्यात आले आहे. तर सर्व पक्षाचे गटनेते, महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, क्रीडा समिती आणि पीएमपीएमएल संचालक समिती अशा सर्वांसाठी पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्यात येणार आहेत. यावरूनच वाद सुरु असून, सर्व पक्षाच्या गटनेत्यांना दुस-या मजल्यावरच कार्यालय पाहिजेत. त्यामुळे हा वाद मिटल्यानंतरच नवीन इमारतीत सर्व पदाधिका-यांचे कार्यालयात स्थलांतरीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या कार्यालय वाटपावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 1:10 PM
नवीन संपूर्ण चार मजली इमारत केवळ पदाधिका-यांसाठी देण्यात आली असली तरी, सध्या कोणाला कोणते कार्यालय व किती जागा यावरून वाद सुरु आहे.
ठळक मुद्देशिवसेनेचा वाटपापूर्वीच प्रशस्त कार्यालयावर ताबा सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्रांवर चार मजली इमारत मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा आणि अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिमनवीन इमारतीत सर्व पदाधिका-यांचे कार्यालयात स्थलांतरीत होणार असल्याचे स्पष्ट