पुणे : महापालिका सभागृहातील आसनव्यवस्थेवरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसे यांच्यात एकमत व्हायला तयार नाही. आम्ही बरोबर जागा वाटप केले आहे, असे भाजपाचे म्हणणे आहे, तर माजी महापौरांचा अवमान होऊ देणार नाही असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अडली आहे.सभागृहात सत्ताधाऱ्यांनी उजव्या बाजूला व विरोधकांनी डाव्या बाजूला बसावे असा संकेत आहे. पहिल्या रांगेत गटनेते असावेत व त्यांच्या बरोबर मागे त्यांच्या पक्षाचे नगरसेवक अशी सर्वसाधारण रचना करण्यात येते. उपमहापौरांनाही पहिल्या रांगेत स्थान देण्यात येते. गेली अनेक वर्षे याच पद्धतीने सभागृहात नगरसेवक बसत असतात.एकूण १६२ सदस्यांच्या सभागृहात भाजपाची सदस्यसंख्या ९८ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० सदस्य आहेत. काँग्रेसचे १०, शिवसेनेचे १० व मनसेचे २ अशी विरोधकांची सदस्यसंख्या आहे. सभागृहात एकूण ४ रांगा आहेत. त्यातील दोन्ही बाजूला पहिल्या रांगेत प्रत्येकी ४ अशा ८ व नंतरच्या दोन रागांमध्ये प्रत्येकी ३ अशा ६, अशा एकूण १४ जागा आहेत. त्यातील ७ जागा भाजपाला व ७ जागा विरोधकांना अशी विभागणी विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुचवली आहे. विरोधी पक्षाचे ४ व राष्ट्रवादीचे माजी महापौर पहिल्या रांगेत अशी व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे. भाजपाला ९८ या सदस्यसंख्येमुळे पहिल्या दोन रांगा तर लागतातच शिवाय तिसरी रांगही लागणार आहे. त्यामुळे या रांगेतील पहिल्या जागा त्यांना हव्या आहेत. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले, की तिसरी रांग आम्ही मागील बाजूने सुरू करू असे विरोधकांना सांगितले आहे. हा आम्ही दाखवलेला मोठेपणा आहे. पण त्यांना तो मान्य नाही असे दिसते आहे. यापेक्षा अधिक कसे काय करता येईल असे भिमाले यांचे म्हणणे आहे. माजी महापौर असले तरी त्यांच्याकडे कोणतेही पद नसल्यामुळे त्यांना कुठे बसवायचे हा त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपाचा संबध नाही असे भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवकांचे मत आहे. (प्रतिनिधी)
आसनव्यवस्थेवरून वादविवाद
By admin | Published: March 24, 2017 4:22 AM