पुणे : वाहतुक पोलिसांची दंडाची रक्कम भरण्यासाठीच्या ‘पुणेट्रॅफीकॉप’ या संकेतस्थळावरून डेबिट कार्डचा पर्यायच देण्यात आलेला नाही. यावर केवळ क्रेडिट कार्ड धारकांनांच दंडाची रक्कम भरता येत आहे. त्यामुळे चालकांना थेट वाहतुक पोलिसांनाच गाठावे लागत आहे.
वाहतुक पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो. त्यामध्ये दंडाची रक्कम, नियमाचे उल्लंघन केल्याचे छायाचित्र आणि ई चलन क्रमांक असतो. ही रक्कम आॅनलाईन भरता यावी, यासाठी वाहतुक पोलिसांनी पुणेट्रॅफीकॉप हे संकेतस्थळ विकसित केले आहे. मात्र, या संकेतस्थळावर केवळ क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरता येतात. त्यामध्ये दीड टक्का सुविधा शुल्क तसेच जीएसटी आकारला जातो. त्याशिवाय वाहतुक पोलिसांकडून ई-चलन उपकरणाद्वारेही पैसे भरण्याची सुविधा आहे. याद्वारे पैसे भरल्यास जीएसटी तसेच इतर शुल्क आकारले जात नाही. असे असले तरी बहुतेक लोकांकडे डेबिट कार्ड असते. क्रेडिट कार्ड असलेल्या लोकांची संख्या तुलनेने खुप कमी आहे. त्यामुळे त्यांना या संकेतस्थळावचा काहीही उपयोग होत नाही.
घरबसल्या दंड भरण्याची अन्य सुविधा नसल्याने लोकांना थेट वाहतुक पोलिसांना शोधत फिरावे लागत आहे. बहुतेक मोठ्या चौकांमध्ये वाहतुक पोलिस असतात. मात्र, एकीकडे पैशांची देवाण-घेवाण घरबसल्या आॅनलाईन पध्दतीने होत असताना हा दंड भरण्यासाठी मात्र वाहतुक पोलिसांना शोधत फिरावे लागत आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डप्रमाणेच संकेतस्थळावरून डेबिट कार्डद्वारेही पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे एका वाहन चालकाने सांगितले.
ई-चलन मशिनवरून डेबिट कार्डने पैसे भरता येतात.‘ट्रॅफीकॉप’वर केवळ क्रेडिट कार्ड द्वारेच पैसे भरता येतात. कोणत्याही चौकातील आमच्या कर्मचाऱ्याच्या ई-चलन मशिनवरून डेबिट कार्डने पैसे भरता येतात.- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा