ऑनलाइन लोकमत
वासुंदे(पुणे), दि. 15 - महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांना नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. याने तमाम शेतकरीवर्ग आनंदी झाला असतानाच सरकारतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वासुंदे (ता. दौंड) येथील वामनराव शंकर भगत या शेतक-याने ‘आपल्याला कर्जमाफीतून वगळण्यात यावे,’ असे लेखी पत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडे सुपूर्त करून स्वत:हून कर्जमाफी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यातील दुसरा शेतकरी होण्याचा मान मिळविला आहे.
वामनराव भगत यांची वासुंदे (ता. दौंड) येथे वडिलोपार्जित जमीन आहे. ते स्वत: शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सद्य:स्थितीत शासनाने राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर शासनाने गॅस सबसिडीप्रमाणे जे स्वत:हून कर्ज भरण्यास सक्षम आहेत, त्यांना कर्जमाफी सोडण्याचे आवाहन केले होते.
याच आवाहनाला प्रतिसाद देऊन व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या शेतक-याने वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांच्या नावे लेखी पत्र लिहून आपण पीककर्ज भरण्यास सक्षम असल्याने शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीतून आपणास वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे.
वामनराव भगत यांच्याकडे ५०,१८५ रुपयांचे पीककर्ज असून, त्यावरील व्याज ८,३४१ असे एकूण कर्ज रक्कम रुपये ५८,५२६ इतकी आहे. या कर्जाची माफी नाकारण्याचे पत्र त्यांनी वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले व सचिव संजय साळवे यांच्याकडे सुपूर्त केले. या वेळी माजी सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच दिलीप जगताप, सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले, दादासाहेब माकर, शहाजी जांबले, प्रभाकर जांबले, मच्छिंद्र जांबले, दिलीप कुंभार, किसन जांबले, दिगांबर हाजबे, सुरेश लोंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.
गरीब शेतकºयांना लाभ व्हावा.. शेतमालाला हमीभाव हवा-
राज्य शासनाने जरी शेतकºयांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आहे, तरीसुद्धा अगदी खेड्यातील गरिबांतील गरीब शेतकºयाला त्याचा लाभ व्हावा, हा उद्देश ठेवून व नुकतीच दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही कर्जमाफी नाकारली त्यांची प्रेरणा घेऊन आपण हा कर्जमाफी नाकारण्याचा निर्णय घेतला. परंतु, तळागाळातील शेतकरी जर वाचवायचा असेल, तर शासनाने शेतमालाला हमीभाव मिळवून देणे गरजेचे आहे.
- वामनराव भगत, कर्जमाफी नाकारणारे शेतकरी