पुणे: मला पूर्वी असे वाटायचे हिंदी, उर्दू आणि बंगाली याच भाषा समृद्ध आहेत. याच भाषेत विपुल साहित्य आहे. पण मी जेंव्हा मुंबईत ‘गिधाडे’ हे नाटक पहिले तेंव्हा माझे डोळेच उघडले. मराठी भाषेची ताकद, त्यातलं साहित्य खूप दर्जेदार आहे. हे त्यावेळी समजलं. जे मराठीत होते, ते खूप पुढचे सांगणारे होते.एका मराठी नाटकांमुळे माझा दृष्टीकोनच बदलला असे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (javed akhtar) यांनी सांगितले.
अन माझं दोनशे रुपयांचे कर्ज फिटले :जावेद अख्तर म्हणाले, मी सुरुवातीला स्टुडिओमध्ये काम करायचो तेंव्हा तिथंच राहायचो. सुरुवातीला ५० रुपये नंतर १०० रुपये पगार झाला. त्यावेळी रात्रीच्या वेळी साहिरजी (sahir ludhianvi) मला त्यांच्या कविता एकविण्यासाठी रात्रीच्या वेळी घरी बोलवत. ज्यावेळी माझी नोकरी गेली त्यावेळी नोकरी मागण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी दोनशे रुपयांची आर्थिक मदत केली. हळूहळू माझी आर्थिक परिस्थिती बदलली. तेव्हा त्यांना मी चेष्ठेने म्हणायचो तुमचे २०० रुपये मी हडप केले. त्यावेळी ते देखील म्हणायचे, आता मला गरज नाही. जेंव्हा लागेल तेंव्हा तूझ्याकडून नक्कीच परत घेईन.
जावेद अख्तर पुढे म्हणाले, साहिर यांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांचे अंत्यसंस्कार करून मी स्मशान भूमीतून निघालो. त्यावेळी धावत तेथील एक कर्मचारी माझ्याकडे आला आणि अंत्यसंस्कारसाठी केलेल्या कामाच्या बदल्यात माझ्याकडे दोनशे रुपये मागितले. मी दिले अन् चालता झालो. पुढे गेल्यावर लक्षात आले. मी साहिरजीकडून घेतलेलं कर्ज असं फेडलं गेलं. हा किस्सा सांगताना जावेद अख्तर यांचे डोळे पाणावले.
‘पीव्हीआर आयकॉन’ चित्रपटगृहामध्ये २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (‘पिफ २०२२’) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानामध्ये अख्तर बोलत होते. चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांची यावेळी उपस्थित होते.
भाषाविषयी बोलताना अख्तर म्हणाले, भाषा ही एकमेकांना जाणण्यासाठी, समजण्यासाठी आहे. पण कधी कधी तीच संवादामधील भिंत बनते. त्यामुळे आपण इतर भाषांमध्ये काय चालले आहे, हे पहिले पाहिजे. विजय तेंडुलकर हे अतिशय सभ्य, शांत मृदू स्वभावाचे होते पण त्यांनी स्वभावाच्या विपरीत नाटके लिहिली. त्यांच्या लेखनातून आग यायची. तेंडुलकर, इस्मत चुगताई, कृष्ण चंद्र हे भारतातील खूप मोठे लेखक-नाटककार होते. साहिर लुधयानवी यांच्या विषयी बोलताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. साहिर यांनी लिहिलेल्या गाण्यांतून मानवी मूल्ये मांडली. आपल्या प्रेम गीतांमध्ये निसर्गाला सामावून त्यांनी घेतले. त्यामुळे त्या गोष्टींना मोठा आयाम मिळायचा. त्यातून नवे विचार यायचे. शैलेंद्र, साहिर हे केवळ गीतकार नव्हे तर लोकांचे तत्त्वज्ञ होते.सिनेमातून दुःखाची गाणी गायब-अख्तर म्हणाले, आता कुणीच दुःखी नाही. पूर्ण विश्वच आनंदात आहे.कुणालाच कसल्या समस्या नाहीत असे मला वाटते.कारण आता सिनेमातून दुःखी गाणे गायब झाले आहेत. ऑल इज नॉट वेल असताना ऑल इज वेल असे सांगितले जात आहे. समाज आता खोट्या व एक प्रकारच्या दिखाव्यात जगत आहे.