पुणे : शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाचा ताण आल्याने एका अधिका-याचा मृत्यू झाला असून, दुसरा अधिकारी कोमात गेला आहे. सहकार विभागातील अधिका-यांवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या असंख्य चुकांचे खापर सहकार विभागावर फोडले जात आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या याद्यांचे काम न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकार विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने घेतला आहे. येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे संघटनेने घोषित केले आहे.राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचे काम करीत असताना इंदापूरमधील सहायक निबंधक रतिलाल अहिरे यांचा मृत्यू झाला.आंबेगाव येथील सहायक निबंधक विठ्ठल खंडागळे कोमात गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या १५० सभासदांनी सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांचीभेट घेतली. झाडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या सदस्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सूर्यवंशी, कार्याध्यक्ष नितीन काळे, खजिनदार संजय सुद्रिक, आनंद कटके आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान,सहायक निबंधक, उपनिबंधक, सहनिबंधक, अप्पर निबंधक आणि विशेष निबंधक दर्जाच्या अधिका-यांनी कामामधील अडचणी व समस्या मांडल्या. मागील तीन महिन्यात सुट्ट्या असतानाही सर्वांनी मेहनत घेऊन योजना यशस्वी करण्यात योगदान दिले आहे. आॅनलाइन यंत्रणेतील दोषांमुळे याद्यांमध्ये गोंधळ झाला आहे. यासोबतच व्हॉट्सअॅपवर येणा-या सूचना आणि आदेशांना कायदेशीर महत्त्व नसल्यामुळे भविष्यात कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता असून संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर चुकीची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर होऊन निर्दोष हिरव्या याद्या जाहीर होईपर्यंत काम न करण्याचा निर्णय संघटनेने चर्चेअंती घेतल्याचे अध्यक्ष सुर्यवंशी यांनी सांगितले.शेतक-यांच्या रोषाचे धनीमाहिती तंत्रज्ञान विभागाने शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी हिरवी यादी तयार करताना असंख्य चुका केल्या आहेत. सहकार विभागाचा संबंध नसताना शेतकरी व तक्रारदारांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना शेतकºयांचा सामना करावा लागत आहे.
‘सहकार’वर कर्जमाफीचा ताण; याद्यांचे काम न करण्याचा इशारा, अधिकारी संघटनेची आयुक्तांसह बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 5:10 AM