राजानंद मोरे/ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - शेतमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनी उपोषणाला पाठिंबा देत आंदोलन व्यापक करण्याचा निर्णय घेतला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर डॉ. आढाव यांनी उपोषणाला सुरूवात केली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, माजी न्यायमुर्ती पी. बी. सावंत, आपचे विजय पांढरे यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. महामंडळाचे संतोष नांगरे, नवनाथ बिनवडे आदी उपस्थित होते.
उपोषणामागची भुमिका स्पष्ट करताना डॉ. आढाव म्हणाले, मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असला तरी केवळ आरक्षण आणि अॅट्रॉसिटी यावर जास्त बोलले जास्त बोलले जात आहे. शेतमालाला हमीभाव मिळण्यावर फारशी चर्चा होत आहे. त्यासाठी आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमुक्ती आणि हमीभाव मिळावा यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असून ते पुढेही सुरूच राहणार आहे. हमीभावाचा मुद्दा जनतेत गेला पाहिजे. नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर अनागोंदी निर्माण झाली आहे. सरकार हमीभावाचा निर्णय घेत नसल्याने शेतकºयांची दैना होणार आहे.
रघूनाथ पाटील म्हणाले, काँग्रेसच्या काळात एका दिवसात आठ शेतकरी आत्महत्या करत होते. आता ती संख्या दुप्पट झाली आहे. सरकार बदलले असले तरी शेतकºयांची स्थिती कायम आहे. आढाव यांच्या आंदोलनामुळे शेतकरी व हमाल पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या दोन घटकांपुरते हे आंदोलन मर्यादित न राहता राज्यभर व्यापक करण्याचा विचार आहे. रस्ते, उ्डडाणपुल बांधण्यासाठी शासनाकडे पैसे असतात. पण शेतकºयांना देण्यासाठी हात रिकामे असतात, अशी टीकाही पाटील यांनी केली.