- डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, सहायक प्राध्यापक, डेक्कन कॉलेज, पुणेदोनशे वर्षांपूर्वी विश्रामबाग वाड्याच्या वास्तूत सुरू झालेलं हिंदू कॉलेज १८५१ साली पूना कॉलेज या नावाने नव्या रूपात आलं. पारंपरिक संस्कृत विषयांबरोबर इंग्रजी विषयही तिथे शिकवले जायला लागले. १८६४ साली डेक्कन कॉलेज असं संस्थेचं नामांतर झालं आणि त्याच वर्षी जमशेदजी जिजीभाई यांनी दिलेल्या सव्वा लाखाच्या देणगीतून त्यांच्याच दीडशे एकर जागेवर नव्या इमारतीचं बांधकामही सुरू झालं. पुणे शहराबाहेर आळंदी रस्त्यावर असणाऱ्या नीओ गॉथिक शैलीत बांधलेल्या पाश्चात्य स्थापत्य शैली जपणाºया या अस्सल देशी दगडांच्या वास्तूने ऊन, वारा, पाऊस झेलत आजवर अनेक संशोधकांना संशोधन कार्याला आवश्यक अशी शांतता मिळवून दिली आहे.ही भूमी, ही वास्तू विलक्षण ताकदीची आहे. आळंदी-पुणे या मार्गावर पायी जाताना ज्ञानोबा माउलींची पावलं कधीतरी या दीडशे एकरात नक्कीच पडली असतील. सवंगड्यांबरोबर रपेट मारायला निघालेल्या शिवबांचा घोडा खचितच कधीतरी इथे आला असेल. मुख्य इमारतीच्या ओसरीवर विद्यार्थिदशेतले टिळक कधीतरी गप्पांची मैफल जमवून निवांत बसले असतील. या ग्रंथालयाच्या शांततेत एखादा लखलखीत विचार इरावतीबार्इंच्या मनात येऊन गेला असेल.१८६८ला इमारत पूर्ण झाल्यावर तिथे सुरू झालेल्या कॉलेजमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं घडली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गो. ब. आगरकर, ग. वि. केतकर, गुरुदेव रानडे, विष्णुशास्री चिपळूणकर, डॉ. रा. गो. भांडारकर, वि.का. राजवाडे, द्वारकानाथ कोटणीस यासारखे दिग्गज जिथे शिकले त्याच कॉलेजमध्ये १९३९ साली पदव्युत्तर आणि संशोधन संस्था म्हणून नामांतर झाल्यावर त्याच संस्थेत डॉ. एच. डी. सांकलिया, डॉ. सु. मं. कत्रे, डॉ. इरावती कर्वे, डॉ. अशोक केळकर, डॉ. मधुकर ढवळीकर यासारख्या अनेक मातब्बरांनी अनेकविध विषयांवर संशोधन केले. पुरातत्व, भाशाषास्र, संस्कृत कोशनिर्माण यांसारख्या दुर्मीळ विषयांवर सकस संशोधन या वास्तूत झालं.१९४८ सालापासून इथे चालू असणाºया संस्कृत कोश प्रकल्पाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने वेदांपासून ते अठराव्या शतकातील ग्रंथांपर्यंतचे संपूर्ण संस्कृत वाङ्मय या एकाच ठिकाणी अभ्यासलं गेलं आहे. १९९५ साली संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला.सध्या संस्थेमध्ये पुरातत्व विभाग, भाषाशास्र विभाग, संस्कृत कोश विभाग असे तीन प्रमुख विभाग आहेत. अंतर्जलीयपुरातत्व, बौद्धपुरातत्व, वारसास्थळांचं जतन आणि संरक्षण, पर्शियन, जपानी, इटालियन यांसारख्या भाषा, भाषाशास्राची ओळख, संस्कृत संभाषण, शास्रीय संशोधन पद्धती यासारख्या विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं. पुरावनस्पतीशास्र, परारसायनशास्र, पुराजीवशास्र, भाषाशास्र या विषयांच्या प्रयोगशाळा आणि संस्कृत कोश विभागात सुरू असणारं महाकाय संस्कृत-इंग्रजी कोशाचं काम विद्यार्थी आणि नवसंशोधकांना अनुभवसमृद्ध करतं. पुरातनातल्या पुरातन गोष्टींचं अध्ययन, अध्यापन आणि संशोधन नव्यातलं नवं तंत्र वापरून केलं जावं यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील. संस्थेचं वैशिष्ट्यपूर्ण अवाढव्य ग्रंथालयही एक स्वतंत्र विभागच आहे. १५८८ साली प्रसिद्ध झालेल्या सर्वात जुन्या पुस्तकापासून अगदी आधुनिक ई-नियतकालिकांपर्यंत असंख्य प्रकारची, पुस्तकं इथे जतन केली आहेत. संस्थेने आजवर केलेल्या उत्खननांमध्ये सपडलेल्या वस्तूंचे आणि पुरावत्व संशोधनाविषयीची माहिती देणारे पुरातत्व संग्रहालय आणि मराठ्यांच्या इतिहासाची विविध साधने, दफ्तरे, बखरी, दस्तावेज यासारख्याचे जतन करणारे मराठा इतिहास संग्रहालय- हे महत्त्वाचं काम!द्विशताब्दी वर्षात जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा विचार आहे. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्व, भाषा या सर्वाच्या जतन आणि संवर्धनाचं काम इथे अव्याहत सुरू राहील हे नि:संशय!
दोनशे वर्षांची तीर्थरूप ज्ञानवास्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 4:57 AM