पुणे : मुंबई व पुण्यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या दख्खनच्या राणीला म्हणजेच डेक्कन क्वीनला राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे नवीन ‘लिंक हाफमन बुश’ (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. तसेच ‘पूल अँड पुश’ हे तंत्रही डेक्कन क्वीनसाठी वापरले जाणार असल्याने गाडीचा वेग वाढणार आहे. त्यामुळे ही गाडी किमान अर्धा तास लवकर पोहचणार असून, प्रवाशांचा प्रवासही पूर्वीपेक्षा अधिक सुखकर होणार आहे. दि. १ जूनपासून नव्या स्वरूपातील डेक्कन क्वीन धावेल, असे सूत्रांनी सांगितले.रेल्वेचे पारंपरिक डबे बदलून त्याजागी ‘एलएचबी’ प्रकारातील नवीन डबे वापरण्यास मागील काही वर्षांपासून सुरुवात झाली आहे. या डब्यांची रचना तसेच अंतर्गत सुविधा पारंपरिक डब्यांच्या तुलनेत चांगल्या असतात. सध्या दुरांतो, शताब्दी, हमसफर एक्स्प्रेसमध्ये हेच डबे वापरले जातात. त्यामधील तंत्रामध्ये अनेकवेळा बदलही झाले आहेत. त्यात ‘पूल अँड पुश’ या तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. या तंत्रामध्ये गाडीच्या दोन्ही बाजूला इंजिनचा वापर केला जातो. सध्या मध्य रेल्वेमध्ये एलएचबी डब्ब्यांसह ‘पूल अँड पुश’ हे तंत्र असलेली मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ही एकमेव गाडी आहे. त्यानंतर आता हा मान डेक्कन क्वीनला मिळणार असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.‘डेक्कन क्वीन’चे सध्याचे सर्व डबे जुन्या रचनेतील आहेत. हे सर्व डबे बदलून त्याजागी ‘एलएचबी’ हे आधनिक स्वरूपाचे डबे बसविले जाणार आहे. त्यामध्ये ‘पूल अॅन्ड पुश’ हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. पूर्वी खंडाळा घाट चढण्यासाठी गाडीला अधिक वेळ लागत होता. नवीन तंत्रामुळे हा वेळ कमी लागणार आहे. तसेच थांबलेल्या गाडीला कमी वेळेत अधिक वेग मिळणे, वळणावरही वेग अधिक राखण्यासाठी मदत मिळणार आहे. गाडीच्या दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळे पुढून आणि मागील बाजूनेही गाडीला वेग मिळेल. त्यामुळे गाडीच्या वेळेमध्ये सुमारे ३० ते ३५ मिनिटांचा फरक पडणार आहे.एलएचबी, पूल अँड पुशचे फायदेवेळेत ३० ते ३५ मिनिटांची बचतआसन व्यवस्था आरामदायीई-टॉयलेटची सुविधामाहितीसाठी डिजिटल फलकडब्यांचे झटके जाणवणार नाहीतगाडीचा वेग स्थिर ठेवण्यास मदतएकूण डबे - १७ (१ डायनिंग कार, ५ एसी, ९ आरक्षित, २ सर्वसाधारण)
‘राजधानी’प्रमाणेच दौडणार ‘डेक्कन क्वीन’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:49 AM