राजगुरुनगर : भामा-आसखेड प्रकल्पातील अंशत: बाधित गावांपैकी रौंधळवाडी आणि चोरघेवाडीच्या १३.६७ कोटींच्या, नागरी सुविधा खास बाब प्रस्तावास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिल्यामुळे अनेक वर्षे नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या या गावांना दिलासा मिळाला आहे. विधानभवनामध्ये ८ मार्च रोजी भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याविषयी आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसन व आळंदी पाणीयोजना याबाबत पालकमंत्र्यांच्या आणि प्रमुख आमदार व नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत पुनर्वसन, आळंदी पाणीयोजना याबाबत निर्णय झाले होते. या बैठकीत रौंधळवाडी, चोरघेवाडी, शिवे, अनावळे, कासारी, वाघू, साबळेवाडी, पापळवाडी या भामा आसखेड धरणात अंशत: बाधित झालेल्या गावांसाठी खास बाब म्हणून नागरी सुविधांना एकूण २५ कोटी देण्याबाबत पालकमंत्री यांनी आश्वासन दिले होते.त्यानुसार प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती पालकमंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केली होती. यातील रौंधळवाडी, चोरघेवाडी-विरोबावस्ती याठिकाणी नागरी सुविधांची कामे करण्याचा १३.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता तसेच पापळवाडी व गवारवाडी रस्ते व नागरी सुविधांचा १.७२ कोटी रुपयाचा प्रस्ताव होता. त्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिलीे. या प्रस्तावात विरोबावस्तीचे रस्ते, चोरघेवाडी रस्ता, विरोबावस्ती विद्युतपुरवठा, चोरघेवाडी विद्युत पुरवठा या वस्त्यांवर हातपंप, विरोबावस्ती व चोरघेवाडी येथे २ स्वतंत्र स्मशानभूमी शेड या कामांचा समावेश असून, प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या नुकसानभरपाई रकमेचा समावेश आहे. (वार्ताहर)शिवे येथील नागरी सुविधांचा खास बाबींचा ९ कोटींचा प्रस्ताव अर्थ विभागात प्रलंबित आहे. त्यालाही मंजुरी मिळावी, अशी शिवे ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे. त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी आशा आहे. भामा आसखेड धरणात काही गावे अंशत: बुडाली होती. या गावांनी पूर्वीच्या गावाच्या उत्तरेला आपल्या नवीन वस्त्या उभारल्या; मात्र गेल्या १४ वर्षांपासून त्यांना वीज, रस्ते, शाळा, पाणी, स्मशानभूमी इत्यादी नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागलेले आहे.
वंचित रौंधळवाडी, चोरघेवाडीला मिळाला दिलासा
By admin | Published: March 19, 2016 2:39 AM