पुणे : जन्म-मृत्यचे दाखले रुग्णालयांकडून माहिती प्राप्त झाल्यावर अवघ्या ४८ तासांच्या आत संबंधितांना मिळावे, याकरिता जन्म-मृत्यू कार्यालयाचे शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विकेंद्रीकरण करण्यात आले़ मात्र याची कार्यवाही सुरू करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना स्मरणपत्रे पाठविली, तरी या आदेशाला क्षेत्रीय कार्यालयाने अद्यापही जुमानलेले नाही़ परिणामी महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयाच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय केवळ कागदोपत्रीच राहिला आहे़
जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९-२००० अंतर्गत उपनिबंधक, जन्म-मृत्यूचे सर्व कामकाज करण्याचे अधिकार क्षेत्रीय वैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना १० जून रोजीच देण्यात आले़ संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रूग्णालयांनी त्यांच्याकडील जन्म-मृत्यूच्या घटनांची कागदपत्रे त्याच क्षेत्रीय कार्यालयात द्यावेत व तेथून नागरिकांना हे दाखल द्यावेत अशी यंत्रणा नियोजित करण्यात आली़
परंतु, एक महिना आठ दिवस उलटूनही अद्याप कुठल्याच क्षेत्रीय कार्यालयात जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचा कक्षच कार्यान्वित झालेला नाही़ जागा नाही, इंटरनेट कनेक्शन नाही आदी कारणे सांगून, क्षेत्रीय कार्यालयांकडून आजही आरोग्य विभागाच्या आदेशाला टाळले जात आहे़ पण महापालिकेचा आरोग्य विभाग व क्षेत्रीय कार्यालय यांच्या समन्वयाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, आजही जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण थांबलेली नाही़
---------------------------