बारामती: पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा घेतलेला धोरणात्मक निर्णय साखर उद्योगासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच केंद्र सरकारने इथेनॉलची दरवाढ देखील केली असून २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इनेथॉल मिश्रणास देखील केंद्राने परवानगी दिली आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
साखर उद्योगाला दीर्घकालीन असा आधार देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बुधवारी (दि.१०) झालेल्या बैठकीत साखर हंगाम सन २०२१-२२ साठी सदरच्या दरवाढीस मंजुरी देण्यात आली. या वाढीमुळे आता इथेनॉलला बी - हेवी मोलासिस - ४६.६६ रूपये, सी - हेवी मोलासिस - ५९.०८ रूपये, ऊसाचा रस - ६३.४५ रूपये प्रति लिटर असा मिळणार आहे.
सदरची वाढ ही प्रतिलिटर १ रुपया ४७ पैसे पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे इथेनॉल पुरवठादारांना किंमतीमध्ये स्थिरता मिळणार आहे. साखर उद्योगाबरोबरच मका, भात, बिट आदीं पासूनही इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे या दरवाढीचा देशातील शेतकºयांना फायदा होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
''दरम्यान, केंद्र्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ साखर उद्योगापुढील अडचणी दूर करण्यासाठी नुकतेच भेटले होते. त्यानुसार साखर उद्योगाला दिलासा देणारे निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जात आहेत, अशी माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.''