पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्य असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचितच आहे. तसेच, काही वर्षांपासून इयत्ता दहावीला फारसे महत्त्व राहिले नाही. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्याने फारसा फरक पडणार नाही. त्याचबरोबर परीक्षा देता आली नाही याबाबत अनेक हुशार विद्यार्थ्यांच्या मनात खंत राहणार आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया शिक्षण विश्वातून व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे करण्याचे शासनाने जाहीर केले. याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासन आदेशानुसार राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचे गुण सर्व शाळांकडून मागविले जाणार आहे. इयत्ता नववी व दहावी विद्यार्थ्यांची मूल्यांकन पद्धती एकसारखी आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास फारशी अडचण येणार नाही, असे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून सांगितले जात आहे.
--------------
राज्य शासन व राज्य मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार आता इयत्ता दहावीचा निकाल तयार करावा लागणार आहे. सर्व शिक्षकांनी त्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. इयत्ता नववी व दहावीची मूल्यमापन पद्धती एक सारखी आहे. त्यामुळे विद्यार्थी व शाळांच्या दृष्टीने हा निर्णय समाधानकारक आहे.
- हरिश्चंद्र गायकवाड ,अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, पुणे
-----------
वर्षभर अभ्यास करूनही आपल्याला परीक्षा देऊन क्षमता दाखवता आली नाही, याबाबतची खंत हुशार विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. तसेच इयत्ता अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी करावी किंवा करू नये, असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे
-------------------
गेल्या काही वर्षांपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला फारसे महत्त्व राहिले असे वाटत नाही. फुगलेले गुण म्हणजे काय? हे यामुळे कदाचित समजू शकेल. तसेच आपल्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात करतात तेच पुढील काळात स्पर्धेत टिकतात. हे अधोरेखित होईल.
- पुष्पलता पवार, माजी सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ
---------------------
शिक्षकांनी वेळ घालवू नये
शाळांनी राज्य मंडळाकडे कोणत्या आराखड्यामध्ये इयत्ता दहावीच्या निकालासाठी गुण पाठवावेत, याबाबतच्या सूचना अद्याप शाळांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या आराखड्यात निकाल तयार करण्यामध्ये आपला वेळ घालवू नये, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी केले आहे.