पुणे : कोरोना आपत्तीत गेली दीड वर्षे स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, सातत्याने काम करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य विभागातील सर्व सेवकांना एक वेतनवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
स्थायी समिती सदस्या अर्चना पाटील यांनी याबाबतचा ठराव स्थायी समितीसमोर सादर केला होता़ त्यास मंगळवारी झालेल्या बैठकीत एकमताने मंजुरी दिली़ या निर्णयामुळे आरोग्य विभागातील आरोग्य विभाग प्रमुखांपासून ते शेवटच्या स्तरावरील कर्मचारी यांना खास बाब म्हणून एक वेतनवाढ देण्यात येणार आहे़
वेतनवाढीचा हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला असला, तरी तो पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे़ त्यामुळे यावर प्रशासन कधी निर्णय घेणार, आधीच आर्थिक अडचणीत सापडलेली महापालिका या निर्णयाची पूर्तता करण्यासाठी कशाप्रकारे निधीची तरतूद करणाऱ याबाबतचा अभ्यास प्रशासनाकडून करून या निर्णयावर पुढील कार्यवाही अपेक्षित आहे़
दरम्यान, यापूर्वीही महापालिकेने सन २००८ मध्ये बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, पुणे महापालिकेच्या व्यवस्थापन टीमने चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना खास बाब म्हणून वेतनवाढ दिली होती़ त्याच धर्तीवर आता आरोग्य विभागातील सेवकांनाही वेतनवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे़
--------------------------