पुणे : कंत्राटी पदभरतीचा निर्णय मागील महाविकास आघाडी सरकाच्या काळात घेण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये. विरोधक आज सत्तेत नाही म्हणून आमच्यावर टीका करत आहे. कायमस्वरूपी पद भरती होईपर्यंतच कंत्राटी भरती करण्यात येणार असल्याने तरूणांनी काळजी करू नये. कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, येत्या काळात राज्य सरकारच्या विविध विभागामंध्ये सध्या सुमारे दीड लाख पदभरती करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले.
शुक्रवारी मार्केटयार्ड येथे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळातर्फे अन्नदान कक्ष, शारदा गजानन पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्त अजित पवार सकाळी मार्केटयार्ड येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुरू शेतकर्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत जेवण कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, संचालक अनिरुध्द ऊर्फ बाप्पु भोसले, संचालक संतोष नांगरे, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर, संचालक नाना आबनावे, गौरव घुले, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, दत्ताभाऊ सागरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे आदी उपस्थित होते.
यापुढे पवार म्हणाले, राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे आवश्यक आहे.त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असे स्पष्टीकरण दिले. मात्र सरळसेवा भरती केली जाणार आहे. राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, म्हणून शिक्षण थांबवता येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आले आहे.