केडगाव : नुकताच महाराष्ट्र शासनाने किराणा दुकानात वाईन विक्री करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत पारगाव यांच्या झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला व किराणा मालाच्या दुकानात कोणालाही वाईन विक्रीसाठी परवानगी देऊ नये असे एकमताने ठरविण्यात आले. त्याचबरोबर किराणा दुकानांमध्ये वाहिनी कृषी अधिकारी परगावी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. विशेष म्हणजे गावामध्ये महाविकास आघाडीचे तालुका पातळीवर बहुतांशी पुढारी आहेत.
पारगाव ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कोणालाही बिअर बार व परमिटरूमसाठी परवानगी देण्यात आली नाही. आणि वर्षानुवर्षे हि गावाची परंपरा कायम ठेवण्यात गावाला यश आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध करत गावामध्ये वाईन विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय ग्रामभेत घेण्यात आला. वाईन बंदीचा हा ठराव सामाजिक कार्यकर्त्या व महाराष्ट्र्र राज्य दारू निर्धारण समितीच्या सदस्या वसुधा सरदार व पारगावचे माजी सरपंच अरुण बोत्रे यांनी मांडला व त्यास सरपंच जयश्री ताकवणे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुभाष बोत्रे, भीमा पाट्सचे संचालक तुकाराम ताकवणे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संजय ताकवणे आदींनी अनुमोदन दिले.
यावेळी वसुधा सरदार यांनी शासनाच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करत शासनाचा हा निर्णय दुर्देवी असून, सन १९४९ पासून दारूबंदी कायदा असून, जनमाणसाचे राहणीमान व आरोग्य सुधारेल हा त्याचा मुख्य हेतू आहे. पारगावमध्ये वर्षानुवर्षे दारूबंदी असून वाईनविक्रीला सुद्धा कोणत्याही प्रकारची अनुमती देऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्याप गावामध्ये दारूला प्रवेश नाही
पारगाव जवळपास १६००० लोकसंख्येचे गाव, परंतु आज रोजी एकही दारूचे दुकान पारगावमध्ये चालू नाही. अथवा ग्रामपंचायतीने चालवण्यासाठी परवानगी दिलेली नाही. विशेष म्हणजे गावातील एकही गाव पुढारी दारू पीत नाही. काही गावांमध्ये दारू दुकाने चालू ठेवण्यासाठी कधी निवडणुका तर कधी दबावतंत्राचा वापर केल्याचे आपण ऐकले आहे. परंतु पारगावच्या गावकऱ्यांची एकी हेच दारू हद्दपारीचे मुख्य सूत्र ठरले आहे.