बेल्हा (पुणे) : आळेफाटा परिसरातील मुस्लीम बांधवांनी हिंदू-मुस्लीम सामाजिक एकतेचे संदेश देत आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मींयांची बकरी ईद हा सण एकाच दिवशी आल्याने मुस्लीम बांधवांनी उत्स्फूर्तपणे कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन सण एकाच दिवशी येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी मुस्लीम बांधवांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी वसीम बेपारी, जाफर पठाण, जब्बार इनामदार, हाजी पटेल, नसीम शेख, मुजाहीद जमादार, मुनाज मोमीन, इन्नुस जमादार, राजू जमादार, नबीलाल मुलाणी, पापाभाई मोमीन, मुबारक मुजावर, हापीज पटेल, असिफ शेख आदी मान्यवर तसेच आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमधील आळे, राजुरी, आळेफाटा, बोरी, पिंपळवंडी, बेल्हा तसेच इतर गावांमधील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार रविवारी (दि. १०) रोजी बकरी ईद हा असून त्यादिवशी मुस्लीम समाजाकडून कुर्बानी दिली जाते. परंतु याच दिवशी हिंदू धर्मीयांची आषाढी एकादशीचे हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पुणे जिल्ह्यातून आळंदी व देहू येथून आषाढी एकादशीसाठी लाखो भाविक/वारकरी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांचे पालखीबरोबर पायी पंढरपूरकडे जात असतात. हे दोन्हीही सण एकाच एकाच दिवशी आल्याने आळेफाटा परीसरातील सर्व गावांमधील मुस्लीम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी स्वतःहून कुर्बानीचा कार्यक्रम न करता तो अन्य दिवशी करण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते घेतला.
या निर्णय याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी उपस्थित मुस्लीम बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी म्हणून बंदोबस्त नेमण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.