खडकवासला-फुरसुंगी बोगद्याबाबतचा निर्णय दसऱ्यानंतरच- अजित पवार

By नितीन चौधरी | Published: October 20, 2023 06:45 PM2023-10-20T18:45:50+5:302023-10-20T18:46:49+5:30

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते...

Decision on Khadakwasla-Fursungi tunnel only after Dussehra- Ajit Pawar | खडकवासला-फुरसुंगी बोगद्याबाबतचा निर्णय दसऱ्यानंतरच- अजित पवार

खडकवासला-फुरसुंगी बोगद्याबाबतचा निर्णय दसऱ्यानंतरच- अजित पवार

पुणे : ‘खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत बंदिस्त बोगद्यातून पाणी नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र, बोगदा झाल्यानंतर ती जागा महापालिकेला देऊन त्या बदल्यात ‘टीडीआर’ अर्थात हस्तांतरणीय विकास हक्क मिळाल्यास बोगद्याचा खर्च कमी होऊ शकतो, असे मत जलसंपदा विभागाने मांडले आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर होणाऱ्या बैठकीत महापालिका व जलसंपदा विभाग यांना मिळून यावर निर्णय घेण्यास सांगू,’ अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “जलसंपदा विभागाने खडकवसला धरणाचे पाणी फुरसुंगीपर्यंत कालव्याद्वारे नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे अडीच ते तीन टीएमसी पाणी वाचू शकते. बोगदा करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे निधी नाही. हा कालवा शहरातून गेला आहे. बोगदा केल्यास दोन्ही बाजूंनी रस्ते असून काही जागा शिल्लक आहे, ही जागा पुणे महापालिकने ताब्यात घ्यावी आणि त्याबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) द्यावा. टीडीआर दिल्यास मोठी रक्कम मिळू शकते. त्याद्वारे बोगद्याचे काम होऊ शकते, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने दिला आहे.

३०० काेटींच्या बाेगद्यासाठी आता लागणार २ हजार काेटी

उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी याबाबत बैठक घेतली होती. पूर्वी या प्रकल्पाची किंमत ३०० ते ३५० कोटी इतकी होती. आता ती २ हजार कोटींपर्यंत पोचली आहे. त्यामुळे नियमावर बोट ठेवून काम करू नका, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा निर्णय घेताना नगरविकास, जलसंपदा, महसूल विभागांचा सहभाग आवश्यक आहे. या विभागांनी त्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. दसऱ्यानंतर बैठक घेऊन त्याचा आढावा घेईन. त्यावेळी ‘जलसंपदाचा हा प्रस्ताव कुठपर्यंत आला आहे, याची माहिती घेईन.”

मुळशीबाबतही निर्णय

मुळशी येथील टाटा धरणातील ५ टीएमसी पाणी पुणे शहराला देण्याबाबत निवृत्त जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांच्या समितीने सरकारला अहवाल दिला आहे. राज्य सरकारने तो मान्य केला आहे. या अहवालावर सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Decision on Khadakwasla-Fursungi tunnel only after Dussehra- Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.