दौंड : दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयास पाणीपुरवठ्यासाठी दररोज पाच पाण्याचे टँकर दिले जातील, अशी ग्वाही दौंड नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता शिवरत्न भोसले यांनी दिली.
‘दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई’ या मथळ्याखाली लोकमतमध्ये शनिवारी ( दि. १३ )वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याची तातडीने दखल घेत मंगळवारी (दि. १६) रोजी पंचायत समिती सभागृहात बैठक झाली. तीत हा निर्णय झाला. यावेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, ग्रामीण ऊपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संग्राम डांगे, पाणीपुरवठा अभियंता शिवरत्न भोसले, नगरसेवक वसीम शेख, अष्टविनायक बांधकाम मार्ग विभागाचे प्रशांत सोनमदे उपस्थित होते.
दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडत सुरु आहे. हे कामासाठी खोदाई करत असताना रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारी सिमेंटची जलवाहिनी फुटली. त्यामुळे नळपाणी पुरवठा बंद झाला होता. त्याला नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दुजोरा दिला आहे. परिणामी, कोरोनाची वाढती परिस्थिती आणि रुग्णांचे पाण्यावाचून होणारे हाल लक्षात घेता लोकमतच्या बातमीच्या आधाराने पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी याकामी पुढाकार घेऊन बैठक बोलावली.
पाणीपुरवठा अभियंता शिवरत्न भोसले म्हणाले की शहरात वीस कोटी रुपयांची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्थान आभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरु आहे या योजनेचा एक भाग म्हणून आडीच लाख लिटर पाणी क्षमतेची टाकी उभी करायची आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयाने चार गुंठे जागा दिली, तर रुग्णालयासह परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल.
डॉ. संग्राम डांगे म्हणाले की, तात्पुरत्या स्वरुपात पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असा तोडगा या बैठकीत निघाल्याने कुठेही खंड न पडता सातत्याने दररोज पाच पाण्याचे टँकर रुग्णालयास दिले जाईल, अशी ग्वाही नगर परिषद प्रशासनाच्या आधिकाऱ्यांनी दिल्याने तूर्त तरी ग्रामीण रुग्णालयाच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे.
--
गट-तट सोडून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा
--
दौंड नगर परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी गट-तट सोडून एकत्रित येऊन तातडीने उपजिल्हा रुग्णालयाच्या नळपाणी पुरवठा योजनेचा रखडलेला प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. कारण, नगर परिषदेच्या निवडाणुका या वर्षाअखेर केव्हाही लागू शकतात तेव्हा नगरसेवकांनी आहे त्या पदाचा उपयोग करुन सामाजिकदृष्ट्या रुग्णालयाचा पाणीप्रश्न कायम स्वरुपी निकाली काढणे आपेक्षित आहे.
--
फोटो १६दौंड पाणीपुरवठा
फोटो : दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात झालेली बैठक