जेजुरी : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतीनिवडीचा निर्णय आता अजित पवारांच्या कोर्टात सोडविला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून खात्रीशीर सांगण्यात येत आहे. पुरंदर पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सभापती गौरीताई कुंजीर यांची गेल्या १५ सप्टेंबर रोजीच ठरलेली मुदत संपलेली आहे. त्यांच्यानंतर कोळविहिरे गणाच्या याच पक्षाच्या अंजनाताई भोर यांना संधी देण्याचे स्थानिक पक्षनेतृत्वाने ठरवलेले होते. मात्र, मुदत संपून तीन महिने उलटले, तरीही विद्यमान सभापती कुंजीर या राजीनामा देण्यासाठी पक्षादेशाची वाट पाहत असल्याने कार्यकर्त्यात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. या संदभार्तील वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी (दि. २) दिले होते. वृत्ताची दाखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पक्षनेतृत्वाने आज सकाळी ११ वाजता पंचायत समिती विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. बैठकीला तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगार्डे, जि. प. सदस्य विराज काकडे, पंचायत समितीच्या सभापती गौरीताई कुंजीर, सदस्या अंजनाताई भोर, सदस्य माणिक झेंडे पाटील आदी उपस्थित होते. या वेळी विध्यमान सभापतींना राजीनामा देण्यासंदर्भात विचारणा केली होती; मात्र सभापती कुंजीर यांनी ज्येष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यास आपण राजीनामा देऊ, असा पवित्रा घेतला. सभापती निवडीच्या वेळी आम्हा दोघींत सव्वा-सव्वा वर्ष देण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याव्यतिरिक्त काहीही बोलण्यास नकार दिल्याने शेवटी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी येत्या ९ तारखेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सुचवून बैठक संपवण्यात आली. या बैठकीसंदर्भात तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची युती आहे. बहुमत नसल्याने एकट्याने निर्णय घेता येत नाही. सत्तेतील सहभागी पक्षाशीही बोलावे लागणार आहे. त्याचबरोबर विद्यमान सभापती निवडीच्या वेळी नेमके काय ठरले होते, हे जिल्हाध्यक्ष आणि मला दोघांनाही माहीत नसल्याने पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून ते सांगतील तो निर्णय घेणार असल्याचे’ सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या घोळामुळे कोळविहिरे गणातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
पुरंदर सभापतींचा निर्णय आता अजित पवारांच्या कोर्टात
By admin | Published: January 05, 2016 2:31 AM