पुणे : राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. वित्त विभागाकडून मंजूर मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात ३ हजार ७४ पदांच्या जागा भरण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत राज्यातील विविध संघटनांकडून मागणी केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापक संघटनांचे पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर सामंत यांनी रविवारी चर्चा केली. सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सामंत म्हणाले, प्राध्यापक व ग्रंथपालांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून प्राध्यापक भरतीची फाईल अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांची या फाईलवर आठवड्याभरात स्वाक्षरी होईल. त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरतीचा अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील तासिका तत्त्वावरील धोरण बंद करण्याची मागणी प्राध्यापक संघटनांकडून केली जात आहे. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे नमूद करुन सामंत म्हणाले, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात २५ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच युजीसीच्या नियमावलीप्रमाणे ४८ मिनिटांचा एक तास गृहीत धरला जाणार आहे. या वाढीमुळे राज्य शासनावर सुमारे ५१ कोटी ५१ लाख ६० हजार एवढा आर्थिक भार पडणार आहे.
प्राध्यापक भरतीमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराचा बद्दल विचारले असता सामंत म्हणाले, प्राध्यापक भरतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. पूर्वी माझ्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर एका अधिका-याची मी बदली केली आहे.