पुणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत, गेली दीड वर्षे प्रलंबित असलेला विषय खास सर्वसाधारण सभा घेऊनही आज पुढे ढकलला. हा निर्णय घेताना आलेल्या उपसुचनांचाही विचार करावा लागेल असे कारण देत आजची सभा तहकूब करण्यात आली.
महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वेतन श्रेणी प्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा. हा प्रस्ताव प्रारंभी वेतन आयोग समितीने सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्याची तयारी केली होती. मात्र याला महापालिका कर्मचाऱ्यांनी विरोध केल्याने चर्चेच्या फेऱ्यातच हा प्रस्ताव अडकला होता. त्यातच कोरोनामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा ही न झाल्याने त्याला आणखी विलंब झाला. अखेरीस पक्षनेत्यांच्या बैठकी व कर्मचाऱ्यांची मागणी यानुसार सातवा वेतन आयोग हा महापालिका वेतनश्रेणी प्रमाणे (ग्रेड पे) नुसारच लागू करून तो राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा असे ठरले. बुधवारी याकरिता खास सर्वसाधारण सभा बोलविली. मात्र या प्रस्तावाला तत्पूर्वी २० उपसूचना आल्याने, यावर चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी १० मार्च पर्यंत ही खास सभा तहकूब केली.