पुणे : समान पाणीपुरवठा योजनेच्या २,६१५ कोटी रुपयांची निविदा प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेण्याची सर्व जबाबदारी मुख्य सभेची आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेचे मुख्य सभेपुढे सादरीकरण करण्यात यावे. अंदाजपत्रकापेक्षा जास्त दर येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. डक्टचे काम स्मार्ट सिटीकडे देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार समना पाणी योजनेच्या निविदेमध्ये निकोप स्पर्धा व्हायची असेल, तर त्यासाठी किमान ८ ते १० ठेकेदारपात्र झाले पाहिजेत, त्यादृष्टीने अटी-शर्ती तयार केल्या पाहिजेत. अंदाजपत्रकापेक्षा जास्त दर येता कामा नयेत. जुने पूर्वगणन पत्रक व आताचे पूर्वगणन पत्रक यांमध्ये तफावत का झाली, याची चौकशी करावी. यामध्ये जे डक्ट केले जाणार आहेत, तो स्मार्ट सिटी योजनेअंतर्गतचा प्रस्ताव आहे.त्यामुळे डक्टचे काम वगळल्यास महापालिकेच्या ३०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. निकोप स्पर्धा होऊन १० ते १५ टक्के बिलो निविदा आल्यास पालिकेचा खर्च एक हजार कोटी रुपयांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.> मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करासमान पाणीपुरवठा योजनेच्या निविदेबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले. त्यामध्ये या निविदा प्रक्रियेत निकोप स्पर्धा व्हावी, अंदाजपत्रकापेक्षा जास्त दर येऊ नयेत, पारदर्शक प्रक्रिया राबवावी असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी पालिकेकडून आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचना राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
समान पाणीपुरवठा योजनेबाबत निर्णय मुख्य सभेने घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:55 AM