Murlidhar Mohol: राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांच्या निर्णयाने नागरिकांत संभ्रम निर्माण होतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:31 PM2021-11-30T14:31:43+5:302021-11-30T14:34:30+5:30
राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यात विसंवाद दिसून येतोय
पुणे : पुणे शहरात कोरोना आटोक्यात येतानाचे चित्र दिसू लागले आहे. दिवसाला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही ६० ते ७० दरम्यान आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत नाट्यगृह आणि सिनेमागृह १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी दिली. परंतु त्याच दिवशी राज्य शासनाकडून ओमायक्रॉन विषाणूच्या अनुषंगाने नवी नियमावली जाहीर करण्यात आली. यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ''राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यात विसंवाद दिसून येतोय. तसेच शासनातील मंत्र्यांच्या निर्णयाने नागरिकांत संभ्रम निर्माण होतोय'' असते ते यावेळी म्हणाले आहेत.
मोहोळ म्हणाले, ''महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात येत असताना सर्व गोष्टींना सुरु होण्यास परवानगी देण्यात आली. पण नाट्यगृह आणि सिनेमागृह यांचा अजिबात विचार केला जात नव्हता. पण कलाकारांच्या रोजगार या मुद्द्यावरून अखेर राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली. त्या निर्णयाने कलाकारांना फारसा दिलासा मिळाला नाही. हा मुद्दा अजित दादांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित दादांनी शहरांतही सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन १०० टक्के मान्यता दिली. मात्र मुख्यमंत्री यांनी त्याच दिवशी सायंकाळी नव्या नियमावलीत नाट्यगृह आणि सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असे नमूद केले. पुणे शहराचे पालकांमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने ते पुणे शहराबद्दल काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. अजूनही आम्ही १०० टक्के क्षमतेने सुरु राहण्याबाबत पालकांमंत्री काय निर्णय घालतील याची वाट पाहत आहोत. कदाचित पुन्हा एकदा अजित दादा मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि हा निर्णय कायम होईल अशी अशा आहे. असाही ते म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री मा. अजितदादा एक निर्णय घेतात आणि राज्य सरकार वेगळाच निर्णय घेतं ! आपल्याला अपेक्षा आहे, उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना १०० टक्के उपस्थितीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवतील. pic.twitter.com/xAseLbgVHM
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 30, 2021
राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने विसंवाद
राज्यात शाळा सुरु करणे, नियम व अति शिथिल करणे याबाबत शासनातील मंत्री वेगवेगळे निर्णय घेतात. तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यातील विसंवाद होत असेल. त्यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण होतोय.