पुणे : प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पावरील निर्णय स्थायी समितीने एक आठवडा पुढे ढकलला. पालिकेच्या मुख्य इमारतीच्या टेरेसवर हा प्रकल्प सुरू करून त्या बदल्यात पालिकेला स्वस्त दरात वीज पुरवण्याचा प्रस्ताव यात एका कंपनीने पालिकेला दिला होता. आयुक्त कुणाल कुमार या प्रकल्पाबाबत आग्रही होते.केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशस्तरावर अशा प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येते. त्यांच्या निविदा स्वीकारलेल्या एका कंपनीने पालिकेला हा प्रस्ताव दिला होता. यात पालिकेने प्रकल्पासाठी त्यांच्या टेरेसची जागा द्यायची, खर्चाची सगळी जबाबदारी कंपनी स्वीकारणार व त्या बदल्यात कंपनी पालिकेला स्वस्त दरात म्हणजे प्रतियुनिट ५ रुपये ६० पैसे या दराने वीज पुरवणार, असा हा प्रस्ताव आहे. आयुक्त कुणाल कुमार त्याची माहिती देण्यासाठी स्वत: स्थायी समितीच्या सभेला उपस्थित होते. विषयाला सुरूवात होताच समिती सदस्य अनिल राणे यांनी त्याला विरोध केला. केंद्र सरकारच्या अनुदानाचा फायदा कंपनीच घेणार, खर्चाची जबाबदारी घेतल्यामुळे प्रकल्प कंपनीच्याच मालकीचा राहणार व जागेच्या बदल्यात पालिकेने स्वस्त दरात का होईना, पण वीज त्यांच्याकडून विकतच घ्यायची हे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याऐवजी केंद्र सरकारने अनुदान घेऊन पालिकेने स्वत:च तज्ज्ञांची मदत घेऊन असा प्रकल्प सुरू केला, तर त्याची मालकीही राहील, अनुदानही मिळेल व वीजही विकत घ्यावी लागणार नाही, असे राणे यांनी सुचवले. अन्य सदस्यही राणे यांच्याशी सहमत झाले. त्यामुळे हा विषय एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्त कुणाल कुमार मात्र या निर्णयानंतर लगेचच स्थायी समितीमधून निघून गेले. (प्रतिनिधी)
सौरऊर्जा प्रकल्पावरील निर्णय लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2016 3:10 AM